मुंबई - कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून गेल्या ५ महिन्यांपेभा जास्त कालावधीपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार यांनीही कोरोना कॉलर ट्यूनचा लोकांना वैताग आल्याचं म्हटलंय.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने लॉकडाऊनमध्ये कोरोना ट्यून अॅक्टीव्हेट केली. प्रत्येक फोन युजर्संना नंबर डायल केल्यानंतर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, अशा तक्रारी नागरिकांच्या आहेत. जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, असं ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यास, नेटीझन्सने बाळा नांदगावकरांची बाजू घेत, रास्त मागणी असल्याचे म्हटले होते. आता, रोहित पवार यांनीही केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांना यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.