मॅनहोलचे झाकण उघडताच वाजणार सायरन; मुंबईमध्ये १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:52 PM2023-06-11T12:52:07+5:302023-06-11T12:52:58+5:30
उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका आता डिजिटल मॅनहोल्सचा उतारा करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी उघडी मॅनहोल असल्याचे निदर्शनास आणणारी अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यानंतर उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका आता डिजिटल मॅनहोल्सचा उतारा करणार आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार मुंबईत संवेदनशील १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर मॅनहोलचे झाकण उघडल्यास सायरन वाजणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने मागवलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला असून लवकरच यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. शिवाय महत्त्वाचे म्हणजे अतिवृष्टीत धोकादायक ठरू शकणाऱ्या शहरातील मॅनहोलवर २४ तास पालिकेच्या सीसीटीव्हीची नजर राहील, असाही प्रयत्न केला जाणार आहे.
पालिका क्षेत्रात मलनिस्सारण विभागाचे जवळपास ७४ हजार आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाअंतर्गत सुमारे २५ हजार मॅनहोल्स आहेत. मुंबईत मुसळधार पावसामध्ये उघडे मॅनहोल्स हे मृत्यूचा सापळा बनतात. अतिवृष्टीत पाणी तुंबल्यामुळे उघडे ठेवण्यात येणारे मॅनहोल्स अत्यंत धोकादायक ठरतात. मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिन्या यांचे मिळून एका लाखाहून अधिक मॅनहोल असून त्यापैकी काहीच मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत.
असे होणार मॅनहोल सुरक्षित
- मॅनहोल सुरक्षेसाठी मुंबई शहर विभागासाठी बाबूला टँक, पश्चिम उपनगरात वर्सोवा आणि पूर्व उपनगरात पंतनगर येथे कंट्रोल रूम सज्ज.
- मॅनहोलच्या देखभाल-स्वच्छतेसाठी सिस्टेमेटिक क्लिनिंगच्या गाड्या २४ तास कार्यान्वित. मॉनेटरिंग आणि चौक्यांच्या माध्यमातून या मॅनहोल्सवर वर्षभर नजर.
- पाच हजारांवर मॅनहोलवर सुरक्षित जाळ्या बसविल्या.
- मॅनहोलच्या ठिकाणांवर सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या डिजिटल मॅनहोल्सची चाचणी होईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर, याची अंमलबजावणी इतर ठिकाणी करण्याचा विचार आहे. त्यासाठीच आता आधी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. - उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सुविधा)