Join us

गणपती बाप्पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली बहीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुरत येथील एका व्यक्तीला लिव्हर सिरोसिस आजार झाला. त्याला वाचविण्यासाठी एकमेव मार्ग होता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुरत येथील एका व्यक्तीला लिव्हर सिरोसिस आजार झाला. त्याला वाचविण्यासाठी एकमेव मार्ग होता तो म्हणजे यकृताचे प्रत्यारोपण करणे. भारतामध्ये तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर निर्बंध असताना बहीण गणपती बाप्पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली. तिने यकृत दान करून भावाला जीवनदान दिले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली

फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लाण्ट ॲण्ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्ता म्हणाले की, ‘ही अनोखी केस होती. आम्हाला समजले की, रुग्णाची बहीण सुनीता गजेरा स्वेच्छेने दान करण्यास तयार आहे. तिची तपासणी करण्यात आली आणि तिचे व तिच्या भावाचे यकृत जुळले. दात्याला प्रवास करण्यासाठी आणि प्रत्यक्षात दान करण्यासाठी आवश्यक सर्व परवानगी मिळवण्याची गरज होती. दाता अमेरिकन नागरिक होती. प्राप्तकर्ता भारतीय होता.

सुरेशची स्थिती खूपच गंभीर होती, ज्यामुळे आमच्याकडे फक्त हाच एकमेव आशेचा किरण होता. आम्ही लॉकडाऊन व निर्बंध असतानादेखील सुनीताला प्रवास करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले. प्रत्यारोपणासाठी सर्व परवानगी मिळवल्यानंतर सुनीता गजेराला प्रवास करण्याची परवानगी मिळाली आणि तिने तिच्या भावाला भेट म्हणून नवीन जीवनदान दिले.

...............................

‘आम्ही अनेक रुग्णालयांमध्ये गेलो आणि अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतला, पण त्यांच्याकडून एकच उत्तर मिळाले की, शस्त्रक्रिया खूपच जोखिमेची आहे. आम्ही डॉ. गौरव गुप्ता यांना भेटलो, तेव्हा त्यांनी शस्त्रक्रिया आणि त्यामधील जोखिमेबाबत सविस्तरपणे सांगितले. पण त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी देखील होऊ शकते, असा आशेचा किरण दाखवला. सर्व कर्मचारी व डॉक्टर्स, तसेच डॉ. स्वप्नील शर्मा यांनी खूप साह्य केले.

..................................

सुरेश देवानी, रुग्ण

माझा भाऊ मला खूप प्रिय आहे. त्याला वाचवण्यासाठी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे समजल्यानंतर मी अधिक वाट पाहिली नाही. कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे परवानगी मिळवणे खूपच त्रासदायक होते, पण फोर्टिस हॉस्पिटलने मला बहुतांश कागदपत्र व्यवहारांमध्ये मदत केली. मला दृढ विश्वास होता की, गणपती बाप्पा माझी प्रार्थना ऐकतील. मी माझ्या भावाचे जीवन वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे मन:पूर्वक आभार मानते. आज तो आरोग्यदायी जीवन जगत आहे. मी त्याला भेट म्हणून माझे यकृत देऊ शकले याचा मला आनंद होत आहे. आमचे नाते आता अधिक दृढ झाले आहे.

सुनीता गजेरा, दाता