भावाच्या हत्येचा कट रचणाऱ्या बहिणीची जन्मठेपेची शिक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:18 AM2021-03-30T03:18:00+5:302021-03-30T03:18:39+5:30
Court News : तिघांच्या मदतीने भावाच्या हत्येचा कट रचणारी बहीण भावा-बहिणीच्या नात्याला कलंक आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संबंधित महिलेने जन्मठेविरोधात केलेले अपील फेटाळले.
मुंबई : तिघांच्या मदतीने भावाच्या हत्येचा कट रचणारी बहीण भावा-बहिणीच्या नात्याला कलंक आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संबंधित महिलेने जन्मठेविरोधात केलेले अपील फेटाळले.
सॉफ्टवेअर इंजिनीअर तसेच मायग्रेनने त्रस्त असलेल्या भावाची हत्या करण्याचा कट बहीण रचत होती. ती भावासाेबतच राहत होती. त्याचदरम्यान ती तीन दोषींपैकी एका दोषीच्या संपर्कात होती. त्या तिघांनी त्याला जीवे मारण्याची योजना आखली, असे निरीक्षण न्या. साधना जाधव व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने नोंदविले.
जगजीतकौर निर्मलसिंह आणि अन्य तीन जणांना २०१३ मध्ये परमजीतसिंह याची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २५ जानेवारी २०१३ रोजी बेशुद्धावस्थेत असलेल्या परमजीतसिंह याला त्याच्या बहिणीने रुग्णालयात नेले. तिच्याबरोबर सहआरोपी होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जगजीत कौरने आपला भाऊ आपल्याला त्याच्या बेडवर बेशुद्धावस्थेत आढळल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे २० फेब्रुवारी २०१३ रोजी पोलिसांनी जगजीत कौरवर तिच्या भावाची हत्या केल्याचा गुन्हा नोंदविला. तर ९ सप्टेंबर २०१४ रोजी पुणे सत्र न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या शिक्षेविरोधात जगजीत कौर व अन्य तीन आरोपी उच्च न्यायालयात अपिलात आले. भावाची हत्या करण्यामागे आपले काहीच उद्दिष्ट नव्हते. आपल्याविरोधात खोटे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे जगजीत कौरने अपिलात म्हटले.
...हा तर भाऊ-बहिणीतील पवित्र नात्याला कलंक!
भावाची भयानक हत्या बहिणीने करावी हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक आहे. कोणीही आपले कुटुंब निवडू शकत नाही आणि बहीण-भावामधील बंधन ही देवाची देणगी आहे. या प्रकरणामुळे या विश्वासाला तडा आणि न्यायालयाच्या विवेकालाही धक्का बसतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. बहिणीसह अन्य दोघांना दोषी ठरवून सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तर एका आरोपीला संशयाचा फायदा देत सुटका केली.