राख्या खरेदीसाठी ‘बहिणीं’ची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:29 AM2018-08-25T02:29:37+5:302018-08-25T02:30:03+5:30

रक्षाबंधनला आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भाऊदेखील गिफ्ट, चॉकलेटच्या दुकानात खरेदी करताना दिसून येत आहेत.

'Sister' for shopping | राख्या खरेदीसाठी ‘बहिणीं’ची लगबग

राख्या खरेदीसाठी ‘बहिणीं’ची लगबग

Next

मुंबई : रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असल्याने बाजारात सुंदर, लखलखीत हिऱ्यांच्या राख्या खरेदी करण्यासाठी बहीणींची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. शहर आणि उपनगरातील दुकाने रंगीबेरंगी राख्यांनी सजली आहेत. रक्षाबंधनला आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भाऊदेखील गिफ्ट, चॉकलेटच्या दुकानात खरेदी करताना दिसून येत आहेत.
दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, मालाड, सायन येथील घाऊक बाजारात आणि प्रत्येक किरकोळ बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, नारंगी अशा भडक रंगाच्या राख्यांना जास्त मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन राख्या बाजारात आल्या आहेत. नेहमीच्या गुंडा राखी, लहान आणि मोठे हिरे असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कलकत्ता राखी, चंदन राखी, डायमंड राखी, मोती राखी, कुंदन राखी अशा प्रकारच्या राख्या भांडुप येथील बाजारात उपलब्ध आहेत. कुर्ल्यातील घाऊक बाजारात १५ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध असल्याचे विक्रेते आविष्कार वांगडे यांनी सांगितले. काही दुकानांमध्ये राखी बनविण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून आले. विविध रंगी धाग्यात हिरे, मणी ओवून आकर्षक राख्या तयार करण्यात येत आहेत. रक्षाबंधन सणातून पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी विविध रोपे आणि झाडांच्या बिया असलेल्या राख्या बाजारात आल्या आहेत. या राख्या काही दिवसांनी कुंडीत विसर्जित केल्यानंतर काही दिवसांतच यातून रोपे तयार होतील.

चॉकलेटला सर्वाधिक मागणी
बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची चॉकलेट, गिफ्ट पॅकेट दाखल झाली आहेत. रक्षाबंधनाला बहुतेक भाऊ-बहिणीला गिफ्ट म्हणून चॉकलेट बॉक्स देतात. कॅनबेरी, स्ट्रॉबेरी कॅरेमल, आॅरेंज असे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये दादर, क्रॉफर्ड मार्केट, मशीद बंदर, गिरगाव, वरळी, कुर्ला, चेंबूर येथील बाजारांत नवनवीन चॉकलेट उपलब्ध आहेत.

Web Title: 'Sister' for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.