Join us

लाडक्या बहिणींना मिळतोय लाभ; अंगणवाडी सेविकांना होतोय ‘ताप’, लवकरच मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 9:39 AM

लाडकी बहीण योजनेचे अर्ज लाभार्थ्यांनी ऑनलाइन केल्यानंतर त्याची पावती व इतर कागदपत्रे जमा करण्याचे अंगणवाडी सेविकांचे काम वाढले आहे.

मुंबई : सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली आहे. मात्र, या योजनेसाठी अर्ज लिहून देताना अंगणवाडी सेविकांच्या नाकीनऊ आले आहेत. अंगणवाडी सेविकांना कुपोषित मुलांना पालकांनी अंगणवाडीत आणले  नाही तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आहार देणे, बालकांचे - महिलांचे आरोग्य व आहार, लसीकरण तसेच किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर मार्गदर्शन अशी अनेक दैनंदिन कामे करावी लागतात.

त्यात आता लाडकी बहीण योजनेच्या कामाचा व्याप अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज लाभार्थ्यांनी ऑनलाइन केल्यानंतर त्याची पावती व इतर कागदपत्रे जमा करण्याचे अंगणवाडी सेविकांचे काम वाढले आहे. त्यामुळे ‘बहिणींचा लाभ, अंगणवाडी सेविकांना ताप’ अशी स्थिती अंगणवाडी सेविकांची झाली आहे. राज्यात १३ हजार ११ मिनी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीसेविकांना इतर कामांचाच व्याप जास्त आहे.

बालके, गर्भवती यांची विशेष काळजी -             १)  सर्व्हे रजिस्टर - अंगणवाडीताई आपल्या कार्यक्षेत्रात फिरून माता, बालकांची माहिती जमा करते व त्यांची नोंद ठेवते.

 २)  पूरक पोषण आहार रजिस्टर - लाभार्थ्यांना दिलेल्या  पूरक पोषणाची नोंद ठेवते.

 ३)  नोंदणी रजिस्टर - आपल्या अंगणवाडी हद्दीतील ज्या महिला गरोदर आहेत त्यांची नोंदणी करून ठेवणे.

 ४)  प्रवेश रजिस्टर - अंगणवाडीत बालकांना प्रवेश दिल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी शिशू नोंदणी करावी लागते.

 ५)  वजन, उंची नोंद वही - बालकांचे वजन, उंची नियमित मोजून त्यांची नोंद करणे.

 ६)  घरपोच आहार वाटप नोंदवही - गरोदर माता तसेच नवजात बालक माता यांना घरपोच आहार पोहोचवून त्यांची नोंद करणे.

अंगणवाडी सेविकांना मानधन किती?

अंगणवाडी सेविकेला १० हजार रुपये, तर मदतनीस महिलेला पाच हजार दोन रुपये दरमहा मानधन मिळते. मात्र, प्रवास भत्ता मिळत नाही.

अंगणवाडी सेविका काय म्हणतात?

सरकारने लेक लाडकी योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना दिले आहे. त्यांचे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरताना त्यांचे अंगणवाडीकडे दुर्लक्ष होते. महिलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या कामाचा ताण वाढल्याने सोलापूर येथे एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला होता. ऑनलाइन अर्ज भरताना अनेक तक्रारी येतात. लेक लाडकी योजनेच्या अतिरिक्त कामाचे कोणतेही मानधन अंगणवाडी सेविकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे.सीमा मुजावर, चिटणीस, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना