बहिणीने केलेल्या कॉलमुळे झाली अपहृत तरुणीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:13 AM2020-01-04T01:13:24+5:302020-01-04T01:13:42+5:30

अपहरणनाट्याचा थरार; जीवे मारण्याची दिली होती धमकी

Sister's call led to the release of the abducted girl | बहिणीने केलेल्या कॉलमुळे झाली अपहृत तरुणीची सुटका

बहिणीने केलेल्या कॉलमुळे झाली अपहृत तरुणीची सुटका

Next

मुंबई : सोबत हत्यार असल्याचा धाक दाखवत, मीरा रोड येथून तरुणीचे अपहरण करत तरुणाने स्कूटीवरून तिला गोराईच्या दिशेने आणले. पुढे ‘तू माझी नाही तर कुणाचीच नाहीस,’ असे म्हणत, मैत्री कायम न ठेवल्यास जीवे मारून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. भीतीने तरुणीने आरडाओरडा करत मदतीसाठी आवाज दिला. मात्र, कोणीही पुढाकार न घेतल्याने तिने त्याच्या नकळत बहिणीला फोन केला. बहिणीला ती गोराई परिसरात पोहोचत असल्याचे समजताच तिने मुंबई पोलिसांची मदत घेतली. पोलीस आल्याचे पाहताच तरुणाने वाटेतच दुचाकीसह तरुणीला सोडून पळ काढला. ही घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी गोराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत, पुढील तपासासाठी तो मीरा रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मीरा रोड परिसरात २१ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. ती ट्रान्सफार्म मीडियामध्ये नोकरीला आहे. भार्इंदर येथील रहिवासी असलेल्या अमीन शेखला ती २०१४ पासून ओळखते. शालेय शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. पुढे शेख सतत क्षुल्लक कारणावरून भांडू लागला. त्याच्या विचित्र स्वभावामुळे एप्रिल, २०१९ पासून तिने त्याच्याशी बोलणे टाळले. तरीदेखील तो तिला धमकावत होता. १ जानेवारी रोजी तिने याबाबत त्याच्या कुटुंबीयांना सांगितले.

२ जानेवारीला सकाळी सव्वानऊच्या सुमारास ती कामावर जाण्यासाठी निघाली. इमारतीखालीच तिला शेख भेटला. कुटुंबीयांकडे तक्रार का केली, यावरून त्याने शिवीगाळ सुरू केली. पुढे सोबत हत्यार असल्याचे सांगून जबरदस्तीने स्कूटीवर बसविले आणि सुसाट वेगाने गोराईच्या दिशेने निघाला. वाटेत मैत्री कायम ठेवली नाही, तर हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. रस्त्यावरील पादचारी, वाहनचालकांकडे तिने ओरडून मदत मागितली. मात्र, कोणीही मदतीसाठी आले नाही. अखेर, तिने बहिणीला फोन करून मदत मागितली. शेखने तो फोनही हिसकावून घेत, नेहाची हत्या करणार असल्याचे सांगत फोन कट केला.

नेहाच्या बहिणीने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास घडलेला प्रकार सांगितला. घटनेची वर्दी लागताच गोराई पोलिसांनी शोध सुरू केला. सकाळी साडेअकराच्या सुमारास तो मनोरी आश्रम येथे पोहोचताच पोलीसही तेथे धडकले. पोलिसांना पाहून त्याने मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी तरुणीला सुखरूप ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

तपास मीरा रोड पोलिसांकडे वर्ग
या प्रकरणी गुन्हा दाखल करत, पुढील तपासासाठी तो मीरा रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती गोराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव नारकर यांनी दिली.

Web Title: Sister's call led to the release of the abducted girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण