लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॉर्डियिला क्रुझ ड्रग्जप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचा (एसईटी) होता, असे एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.
आपण केलेल्या तपासावर शंका निर्माण करणे, हाच एसईटी अहवालाचा हेतू होता, असे वानखेडे यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘कॉर्डियिला ड्रग्ज प्रकरणी केलेल्या तपासावर शंका निर्माण करणे, हेच अहवालाद्वारे विशेष पथकाला साधायचे होते. जेणेकरून आर्यन खानला क्लीन चिट देण्याचा हेतू साध्य करता येईल आणि त्याचे समर्थनही करता येईल,’ असे वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून सोडवण्यासाठी २५ कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयने वानखेडे व काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेचे समर्थन करण्यासाठी वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
वानखेडे यांच्या तपासात त्रुटी असल्याचे एसईटीच्या अहवालात म्हटले आहे व त्याआधारे वानखेडेंवर गुन्हा दाखल केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्याला उत्तर देताना वानखेडे यांनी म्हटले आहे की, अधिकाऱ्याची छळवणूक करण्यासाठी, एसईटीने तथ्य मोडीत काढत एका प्रामाणिक अधिकाऱ्याचे करिअर धोक्यात आणण्यासाठी खोटे आरोप केले आहेत. जेणेकरून आर्यनला क्लीन चिट देता येईल.
२३ जूनपर्यंत वानखेडेंना दिलासा
गुरुवारच्या सुनावणीत समीर वानखेडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाला सांगितले की, वानखेडे आतापर्यंत चौकशीसाठी सात वेळा सीबीआय कार्यालयात गेले आहेत. त्यानंतर सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेवर २३ जून रोजी सुनावणी घेऊ असे म्हणत तोपर्यंत त्यांच्या अटकेपासून अंतरिम संरक्षणात वाढ केली.