पत्रकाराच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:36 AM2023-02-12T11:36:27+5:302023-02-12T11:37:07+5:30
वारिशे मृत्यू प्रकरण : गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. याविषयी पत्रकार संघटना, तसेच विरोधी पक्षाकडून होणाऱ्या मागणीची दखल घेत फडणवीस यांनी हे आदेश जारी केले.
राजापूर तालुक्यातील पत्रकार वारिशे यांचा ६ फेब्रुवारीला थार कारने धडक दिल्याने अपघात झाला. कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना ७ फेब्रुवारीस त्यांचा मृत्यू झाला. पत्रकार संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर आरोपी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली. बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्यानेच वारिशे यांची हत्या झाली. आंबेरकर हा भूमाफिया असून, त्यानेच वारिशे यांना गाडीने धडक देत त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अखेर फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.
सूत्रधार कोण, मलाही धमकी : संजय राऊत
या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. रिफानरीच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून वारिशे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पाच्या आसपास जमिनी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची यादीच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारिशे कुटुंबीयांना तातडीने ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वारिशेंचा मुद्दा उचलाल तर तुमचाही वारिशे करू, अशी धमकी आली असल्याचेही राऊत म्हणाले.
न्यायधीशांच्या देखरेखीखाली तपास करा : काँग्रेस
वारिशे यांच्या हत्येमागे कोणाकोणाचे हितसंबंध आहेत, हे उघड होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.