तरुणाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, उच्च न्यायालयाचे पोलीस आयुक्तांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:35 AM2020-08-18T02:35:26+5:302020-08-18T02:35:34+5:30
या एसआयटीमध्ये दोन वरिष्ठ पोलिसांचा समावेश करा आणि तपास जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने दिले.
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडलेल्या २२ वर्षीय युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार पोलिसांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले.
या एसआयटीमध्ये दोन वरिष्ठ पोलिसांचा समावेश करा आणि तपास जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने दिले.
वांद्रे विभागाच्या पोलीस सहायक आयुक्तांनी एप्रिलपासून आतापर्यंत समाधानकारक तपास केला नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना सोमवारी दिले.
पीडित व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जलदगतीने या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, असे न्यायालयाने म्हटले. ‘मुंबई आयुक्तांना विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश देण्याव्यतिरिक्त आमच्याकडे पर्याय नाही. दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची २४ तासांत नियुक्ती करा,’ असे निर्देश न्यायालयाने दिले.
नवीन तपास पथक एका महिन्यात आरोपपत्र दाखल करेल, अशी अपेक्षा आम्हाला आहे. व्यवसायाने वकील असलेल्या फिरदौस इराणी यांनी लॉकडाऊनदरम्यान पोलीस त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून सामान्यांना मारहाण करत असल्याबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
याचिकेनुसार, राजू देवेंद्र त्याच्या कुटुंबीयांसह २९ मार्च रोजी मध्यरात्री त्याच्या नातेवाइकांकडे जात होते. विलेपार्ले येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना देवेंद्र याला ताब्यात घेतले असून जुहू पोलीस ठाण्यात ठेवल्याचे सांगितले. दुसºया दिवशी सकाळी पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला सांगितले की, त्यांना देवेंद्र जवळच्याच चौकात पडलेला आढळला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, देवेंद्र चोरी करण्यासाठी आला आहे, असे समजून जमावाने त्याला मारहाण केली. याप्रकरणी केलेल्या करवाईवर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत ‘काहीही काम न करता त्यांना वेतन मिळत राहील,’ असे मत व्यक्त केले़
>अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोध
गेल्या महिन्यात राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून देवेंद्र याला जमावाने मारहाण केली नाही. घटनास्थळी जमाव नव्हता. त्याला चार पोलीस हवालदारांनी मारहाण केली. सोमवारी सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, चार पोलीस हवालदारांची खातेनिहाय चौकशी सुरू असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाईवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.