"कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 02:31 PM2023-03-28T14:31:26+5:302023-03-28T14:32:20+5:30
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी
"मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी," अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या अहवालातून मुंबई महापालिकेतील कट, कमिशन आणि कसाई असा कारभार समोर आल्याची टीका शेलार यांनी केली.
मुंबई भाजपा कार्यालयात आज आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅगच्या अहवालातून समोर आलेली निरिक्षणे मांडून या प्रकरणी चौकशीची मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र ही लिहिले आहे. यावेळी आमदार ॲड आशिष शेलार पुढे म्हणाले की, "पूर्वी एक सिनेमा आला होता "पाप की कमाई", पण आता मुंबई महापालिकेतील ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळयावर सीएजीने जे विश्लेषण केले आहे त्यावरुन स्पष्ट दिसते आहे की, मुंबई शहरात काय लुटमार चालली आहे. त्याचे वर्णन करायचे झाले तर ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते. त्याचे वर्णन करायचे तर "कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल."
"कट, कमिशन आणि कसाईचा गोरस धंदा या दोघांच्या उघड्या डोळयासमोर सुरू होता ते आता उघड झाले आहे. मुंबईत सर्रासपणे मुंबईकरायचे खिसे कापले गेले, निर्दयीपणे खिसे कापले गेले, एखादा कसाई ज्या पद्धतीने निर्दयी वागतो तसे हे मुंबईकरांसोबत वागले. मुंबईकरांचे जीव गेले. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला. या संपूर्ण प्रकरणचा "कट, कमिशन आणि कसाई" असा एक चित्रपट बनावा अशा या सगळया घटना आहेत," असे शेलार यांनी नमूद केले.
कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे पत्र आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
"कार्यपद्धती ही कट, कमिशन, कसाई सारखी"
"पालिकेने दोन भागांमध्ये २० कामे, २१४ कोटींची टेंडर न काढताच दिली. ४७५५ कोटींची कामे ६४ कामे कंत्राटरांना दिली पण त्याचा करारच करण्यात आला नाही. त्यानंतर ३३५५ कोटींची तीन वेगवेगळ्या विभागाची १३ काम ही टेंडरमध्ये दिली आहेत त्याची पडताळणी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची व्यवस्थाच नाही. पारदर्शकतेचा अभाव, निष्काळजीपणा, ढिसाळ नियोजन आणि निधीचा गैरवापर या बाबी यातून उघड झाल्या आहेत. म्हणून उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे सरकार हे कसाई सारखे मुंबईकरांशी वागले. त्यांची कार्यपद्धती ही कट, कमिशन, कसाई सारखी आहे असे आमचे म्हणणे आहे," असा आरोप आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला.
दहीसर मधील ३२,३९२.९० चौरस मीटर जागा (बागेचा/ खेळाचे मैदान/ मॅटर्निटी होम यासाठी १९९३ च्या डी.पी. प्रमाणे राखीव होती डिसेंबर २०११ मध्ये अधिग्रहणाचा BMC चा ठराव झाला त्याचे अंतिम भूसंपादन मूल्यांकन : ३४९.१४ कोटी ठरवण्यात आले हे करताना सूत्र वापरुन २०११ पेक्षा ७१६ % अधिक म्हणजे २०६.१६ कोटी रुपये अधिकचे मूल्यांकन करण्यात आले. ज्या जागेची किंमत १३० कोटी होती ती ३४९ कोटी केली. तेवढ्यावरच थांबले नाहीत, विकासाला निर्माण करता यावे म्हणून त्या जागेवर अतिक्रमण होते ते काढण्यासाठी पालिकेने ७७.८० कोटी खर्च केले. म्हणजे १३० कोटींच्या जागेवर ४२० कोटी रुपये खर्च केल्याचा हिशोब त्यांनी यावेळी दाखवून दिला.
"सॅप प्रणालीच्या नावाखाली लूट"
"सॅप प्रणालीच्या नावाने मुंबई महापालिकेला या कसायांनी लुटले," असा आरोपही ॲड शेलार यांनी केला. "या सॅप प्रणालीमध्ये एकुण सात मोडयूल होते पैकी दोन मॉड्यूल आतापर्यंत म्हणजे २००६ ते २०२३ या १६ वर्षात कार्यान्वयीत झाली. पाच मॉड्यूल कार्यान्वयीत झाली नाही. मात्र न केल्या कामाचे पैसे या कंपन्यांना देण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो आंदोलन करीत होतो त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, सॅप सॅप म्हणून भूई धोपटत आहेत. वारंवार केवळ शब्दछळ करुन विनोद करणाऱ्यांनी त्यावेळीही असाच विनोद केला तरी त्यातील सत्य आता उघड झाले आहे. या प्रणालीमध्ये टेंडर फेरफार होतात असेही आता उघड झाले आहे हे अत्यंत गंभीर आहे," असे त्यांनी नमूद केले.
"डॉ. ई मोजेस मार्ग, केशवराव खाडे मार्ग, या आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील या कामांमध्ये कंत्राटरांनी निविदा अटींचा भंग केला तरी कंत्राटदाराला मदत करण्यात आली २७ कोटींचा लाभ कंत्राटदाराला झाला हे कंत्राटदार तुमचे जावई लागतात का, असा सवालही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला. परेल टीटी उड्डाण पुल, मिठी नदी अशा वरळी, वांद्रे मातोश्री जवळची अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळयाची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, कसाई कोण हे मुंबईकरांसमोर उघड व्हावे," असे शेलार यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत ३६ विधानसभांमध्ये सावरकर गौरव यात्रा
"मुंबईतील ३६ विधानसभांमध्ये येत्या पाच दिवसात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपटाचे देखावे,गिते, त्यांचे विचार याचे विविध चित्ररथ तयार करून ही यात्रा काढण्यात येणार आहे. जे जे सावरकर भक्त आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे," असे आवाहन आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले. "उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणांध्ये सावरकर प्रेम दाखवण्यापेक्षा या सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे," असे ते म्हणाले.