डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटीमार्फत चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:38 AM2021-03-10T05:38:14+5:302021-03-10T05:39:05+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख; सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केली. डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांनी त्यांचा छळ केला, अपमान केला असे लिहिलेले आहे. हे पटेल पूर्वी गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते असे अनिल देशमुख यांनी म्हणताच भाजपचे सदस्य संतप्त झाले. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी आपल्याला पत्र दिले असून त्यातही प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या त्रासापायी मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.
देशमुख यांनी सांगितले की, प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या व काही अधिकाऱ्यांच्या दबावातून आपला छळ करण्यात आला. मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी पटेल यांच्या माध्यमातून दबाव आणला जात होता, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये आहे. तत्पूर्वी या विषयावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत, असे म्हटले होते.
महाराष्ट्र हे आत्महत्येचे डेस्टिनेशन होतेय का?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, रायपूरचे आयएएस अधिकारी राजेशकुमार श्रीवास्तव यांनी नागपुरात येऊन आत्महत्या केली. येथील सरकार आपल्याला न्याय देईल असे त्यांना वाटले, त्यांचा महाराष्ट्रावर किती विश्वास होता असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत भाजपवर हल्ला चढविला. त्यावर,‘आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. महाराष्ट्रात येऊन कोणी आत्महत्या करतोय याची गृहमंत्र्यांना खुशी होत असेल तर महाराष्ट्र आता पर्यटनाचे नव्हे तर आत्महत्येचे डेस्टिनेशन होतेय का’, असा घणाघात फडणवीस यांनी केला.
राजेशकुमार श्रीवास्तव हे मध्य प्रदेशातील रायपूरचे अधिकारी असल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला होता. त्यावर, रायपूर छत्तीसगडमध्ये आहे आणि तिथे काँग्रेसचे सरकार आहे हे गृहमंत्र्यांना माहिती नाही का अशी विचारणा फडणवीस यांनी केली. त्यावर आपण उत्तरात दुरुस्ती केली आहे असे देशमुख म्हणाले.
‘मुंबई पोलिसांबद्दल ते अशी भाषा कशी वापरू शकतात?’
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. असे असताना मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशा प्रकारची भाषा ते कसे वापरू शकतात, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. असे असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलिसांवर एवढा राग का काढत आहेत, याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. क्षुद्र राजकारणासाठी अशा पद्धतीने आरोप करू नका, असे आवाहनही देशमुख यांनी केले.