मुंबई : त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात प्रवेशासाठी एक विशिष्ट जमाव मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी असेल.याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाईचे आदेशही फडणवीस यांनी दिले. एसआयटी गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वरमंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
काय आहे प्रकरण?- ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना १३ मे रोजी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मिरवणुकीद्वारे जाऊन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले, असे हे कथित प्रकरण आहे. - या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने सदर मिरवणूक थांबवत चौकशी केली. देवस्थान ट्रस्टच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली होती.