दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी SIT मार्फत केली जाईल, अशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. ५ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदाराने तणावातून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमधून स्पष्ट होत आहे. दादरा-नगर हवेली प्रशासक प्रफ्फुल खेडा पटेल यांनी मला राजकीय जीवनातून उडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा उल्लेख अनिल देशमुख यांनी केली. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT (विशेष तपास पथक) स्थापन केली जाणार आहे. सुसाईड नोटमध्ये खेडा पटेल यांच्याशिवाय अनेक नेत्यांची नावे नमूद आहेत असे पुढे देशमुख म्हणाले.
दादरा-नगर हवेली प्रशासक प्रफ्फुल खेडा पटेल हे अगोदर गुजरातचे गृहमंत्री देखील होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. सर्वांना माहिती महाराष्ट्रात न्याय मिळतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र शासन याच्यावर माझा विश्वास आहे,असं सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. पटेल आणि काही अधिकाऱ्याच्या दबावाखाली मला त्रास देण्यात येत होता. अडचणी येत होत्या आणि सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या, असे डेलकर यानी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याची माहिती देशमुख यांनी सभागृहात दिली.
डेलकर यांच्या मुलाने आणि पत्नीने पत्र देखील लिहिले असून त्यात त्यांनी प्रफुल्ल खेडा पटेलावर आरोप लावले आहेत. माझे वडिल हे प्रचंड दबावाखाली होते असे म्हटले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती, या आत्महत्येनंतर पोलिसांना त्यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली, जवळपास १४-१५ पानांचे हे पत्र होतं, त्यात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत होतं.