लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक एसआयटीचे नेतृत्व करतील.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती. त्यावर, चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी होणार, अशा बातम्या त्यानंतर आल्या. प्रत्यक्षात सोमवारच्या शासन निर्णयात जरांगे पाटील यांचा उल्लेख नाही.
तीन महिन्यात अहवाल
आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना आंदोलनांचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा/वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे याबाबतची चौकशी केली जाणार आहे. एसआयटी तीन महिन्यांच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करेल.