दिशा सालियन प्रकरणी SIT, आदित्य ठाकरेंची चौकशी; राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 02:12 PM2023-12-16T14:12:56+5:302023-12-16T14:13:54+5:30
या चौकशीप्रकरणी आदित्य ठाकरेंनीही महायुती सरकारवर निशाणा साधला.
मुंबई - दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी आदित्य यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी राज्यातील महायुती सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यावरुन, आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक होताना दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी विद्यमान सरकारकमधील दोन मंत्र्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या चौकशीप्रकरणी आदित्य ठाकरेंनीही महायुती सरकारवर निशाणा साधला.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या एसआयटी समितीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. याप्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा, असं आवाहन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.
#WATCH | Delhi: On BJP leader Nitesh Rane's statement, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "You can set up an SIT. The SITs are raining everywhere...You dismissed the SIT we had made. In the tenure of Uddhav Thackeray, we set up three SITs on issues even more serious than… pic.twitter.com/iwRqSAb9rd
— ANI (@ANI) December 16, 2023
सध्या एसआयटींचा पाऊस पडत आहे, यावर एसआयटी, त्यावर एसआयटी म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. आमच्या सरकारच्या काळात ३ गंभीर विषयांवर आम्ही एसआयटी नेमली होती, ती एसआयटी विद्यमान सरकारने रद्द केली. आयएनएस विक्रांत, नवलानीची एसआयटी होती ती रद्द केली. हे केवळ राजकारण सुरू आहे. नाशिकमध्ये ललित पाटील ड्रग्समधील आरोपी आहे, त्याचे दोन कॅबिनेट मंत्र्यांशी थेट संबंध आहेत. ते प्रकरण दुर्लक्षित करण्यासाठी ही एसआयटी चौकशी होत आहे. चौकशी करायची असेल तर करा, पण ललित पाटील प्रकरणीही एक चौकशी नेमा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
शर्मिला ठाकरेंकडूनही पाठराखण
आदित्य ठाकरे चौकशीत अडकले असतानाच त्यांच्या बचावासाठी काकी शर्मिला ठाकरे पुढे आल्या आहेत. आपल्या विधानातून शर्मिला यांनी काकू आदित्य ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशा तर कोणीही लावेल. आम्ही पण त्यातून गेलो आहोत, असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं. शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची जाहीरपणे पाठराखण करत, ठाकरे राजकीयदृष्ट्या वेगळं असलं तरी कुटुंब म्हणून एकच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे, ही त्यांची सवय असून यंत्रणांचा गैरवापर या सरकारकडून होत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ज्यांना भाजप घाबरतो त्यांच्यावरच घाणेरडे आरोप केले जातात. त्यांचीच बदनामी केली जाते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले की, ते असे वातावरण निर्माण करतात. आरोप करणे त्यांचे धोरण आहे, त्यांना भीती वाटते, हे चांगले आहे, अशा शब्दांत आदित्य यांनी भाजपा आणि महायुती रविवारी एसआयटीच्या प्रश्नावरुन हल्लाबोल केला.