घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी; भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:30 PM2024-05-22T16:30:53+5:302024-05-22T16:32:07+5:30
घाटकोपर होर्डिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये लागत असल्याचे सांगण्यात येत असल्याने भावेश भिंडेच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे.
मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी अटक केलेल्या भावेश भिंडेच्या कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
घाटकोपर होर्डिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये लागत असल्याचे सांगण्यात येत असल्याने भावेश भिंडेच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे. होर्डिंगसाठी परवानगी कोणी दिली? प्रमाणपत्रे कोणी दिली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलुंड येथील भावेश भिंडे याच्या इगो मीडिया प्रा. लि.च्या कार्यालयातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली
आहे.
या कागदपत्रांद्वारे पथक अधिक तपास करत आहे. तसेच आतापर्यंत त्याच्या मुलुंड येथील कार्यालयातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, अन्य जणांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या बँक खात्याचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. त्याच्या इगो प्रायव्हेट लिमिटेडसह त्याच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहाराबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे. एसआयटीकडून बँकांसोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. एसआयटीचे पथक मंगळवारी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथे गेले. घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग व्यवस्थित लावण्यात आले होते की नाही, हे शोधण्यासाठी पोलिसांना व्हीजेटीआयची मदत घ्यायची आहे.
या अधिकाऱ्यांचा समावेश घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत
१६ जणांचा बळी गेले असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करणार असून, मुंबई गुन्हे शाखेचे सह आयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. एसआयटी टीममध्ये ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत तर, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे तपास अधिकारी आहेत.