बसून रहाणे सिगारेटपेक्षा धोकादायक - डॉ. जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:39 AM2020-09-29T05:39:11+5:302020-09-29T05:40:05+5:30
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
अतुल कुलकर्णी।
मुंबई : कोरोनामुळे बैठे काम वाढले आहे. लोकांचे चालणे कमी झाले आहे. त्यामुळे आता एका जागी जास्त वेळ बसून राहणे. सिगारेट ओढण्यापेक्षाही गंभीर आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, त्यासाठी त्यांनी त्याला ‘सिटींग ईज न्यू स्मोकिंग’ असे नाव दिले आहे. तेव्हा एका जागी जास्त वेळ बसू नका, चालत रहा, नाही तर मधूमेहाचे शिकार व्हाल, असे स्पष्ट मत इंडियन डायटिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा व मुंबई डायट अॅण्ड हेल्थ सेंटरच्या डायरेक्टर डॉ. शिल्पा जोशी यांनी व्यक्त केले.
ही संपूर्ण मुलाखत लोकमत यूट्यूबवर ‘ग्राऊंड झिरो’ कार्यक्रमात पहायला मिळेल. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे बैठे काम वाढले आहे. व्यायाम नाही आणि किचन शेजारीच आहे. शिवाय मलाही कोव्हीड होऊ शकतो, या भीतीने तणाव वाढला आहे. मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांची शुगर वाढली आहे. घरातच असल्यामुळे खाण्यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात नाही आला तर कोरोनाचा धोका अधिक बळावतो, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी हळद, काळे मिरे यांसारख्या
गोष्टींचा मधुमेहींनाही फायदा. दालचिनीमुळे वजन नियंत्रणात राहते. दूध-हळद अत्यंत प्रभावी औषध आहे. दूध-हळदीमध्ये मध, लिंबू, साखर वापरू नये.
भात, ब्रेड, चपाती, बटाटा हे स्टार्च घटकात मोडतात. बटाटा आवडत असेल तर पोळी किंवा भात वगळा. मधुमेह नियंत्रणात ठेवायचा तर भाज्या महत्त्वाच्या. किमान ३० ते ६० मिनिटे रोज चालले पाहिजे. शुगर फ्री आरोग्यासाठी अपायकारक. स्वीटनरचा वापर फक्त चहा, कॉफीत करा. स्वीटनर घालून केलेले पदार्थ अपायकारक. साखर, गुळ, मध आणि साबुदाणा मधुमेहींचे शत्रू.