मुंबई - भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी १९५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर, राजकीय पक्षांनी सभांचा धडाकाच सुरू केला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी विविध मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभा झाल्याचं दिसून आलं. शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईतील पनवेल येथीलस सभेतून भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका करताना आपण डोकं खाजवतो, ते दाढी खाजवतात, असेही ठाकरेंनी म्हटले.
सध्याची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत केली. पक्षाच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. देशात पुन्हा चुकून भाजपची सत्ता आली तर ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपला सत्तेत येणार असल्याचा एवढाच आत्मविश्वास आहे, तर मग फोडाफोडी कशाला करता? अयोध्या विमानतळाचे नामकरण करण्यात आले तर नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव अद्याप दिले जात नाही, यांसह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. यावेळी, एकनाथ शिंदेंवरही त्यांनी निशाणा साधला.
त्या गद्दारांच्या नायकालाही विचारा, आपण डोकं खाजवतो, ते दाढी खाजवतात. स्वत:ची दाढी स्वत:च खाजव, कारण पैसे खूप आहेत, दाढी खाजवायलाही भाड्याने माणसं ठेवली असतील तर मला माहिती नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, तुम्हाला असं काय मी दिलं नव्हतं?, बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं जे जे देता येत होतं ते सर्वकाही तुम्हाला दिलं. आता, यांना वाटतंय की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. पण, घोडा कसा लाथ घालतो ते कळलंच असा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
शिवसेनेकडून मावळसाठी संजोग वाघेरे?
मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे पाटील हेच उमेदवार असल्याचे देखील अप्रत्यक्षरित्या यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगिलते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली. भ्रष्टाचारी, बलात्करी आणि तडीपाऱ्यांचा पक्ष हा भाजप आहे. या भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेचे राऊत म्हणाले.यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, संजोग वाघेरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल शहरातील कार्यालयाच्या बाजूलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन कार्यालय सुरु करण्यात आल्याने भविष्यात दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याठिकाणी खटके उडण्याची शक्यता आहे.