नितीन जगतापमुंबई : चेंबूर येथे झाड अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या कुटुंबीयांना दीड वर्ष उलटूनही शासनाचा मदतनिधी आणि नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांवर हलाखीचे दिवस ओढावले आहेत. शारदा यांच्या पतीने दुसरा विवाह केल्याने त्या विभक्त राहायच्या. घुणीभांडी करून त्या तीन मुलांचे पालनपोषण करीत होत्या. पांजरपोळ येथे एका झोपडीवजा घरात त्या वास्तव्यास होत्या. ७ डिसेंबर, २०१७ रोजी घरकाम करून परतत असताना चेंबूरच्या डायमंड गार्डन बसथांब्याजवळ त्यांच्या अंगावर झाड कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर, महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मदतनिधी आणि सरकारी नोकरी देण्याची हमी दिली होती. मात्र, महापालिकेने एक लाखांच्या मदतीवर कुटुंबीयांची बोळवण केली. स्थानिक लोकप्रतिनिधीने जाहीर केलेले ५ लाख आणि सरकारी नोकरीचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे शारदा यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांवर घर चालविण्यासाठी निम्न दर्जाची कामे करण्याची वेळ ओढावली आहे.
शारदा यांची तीनही मुले सध्या आपल्या आजीकडे राहतात. आईच्या निधनानंतर घरखर्च कसा चालवावा आणि दोन्ही लहान भावंडांना कसे सांभाळावे, असा पेच अकरावीत शिकणाºया त्यांच्या मोठ्या मुलासमोर (सुमीत घोडेस्वार) निर्माण झाला. घरात अन्न शिजविण्यासाठीही पैशांची चणचण निर्माण झाल्याने, त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
सुमितचा छोटा भाऊ सध्या अकरावीला आहे, तर बहीण नववीला शिकते. त्यांच्या संपूर्ण शिक्षणासह पालनपोषणाची जबाबदारी सुमित उचलत आहे. मात्र, इतक्या कमी पगारात घर चालविणे कठीण असल्यामुळे, शासनाने जाहीर केलेल्या मदतनिधीच्या आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सुमितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
...म्हणूनच सोडावे लागले शिक्षणमी अर्धवेळ नोकरी करून शिकू शकलो असतो, परंतु त्या पगारात घरखर्च आणि भावंडांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे शक्य नव्हते. त्यामुळे शिक्षण सोडावे लागले. जर शासनाने नोकरी दिली, तर ती नोकरी सांभाळून स्वत:सहीत भावंडांना उच्चशिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवेन.- सुमित घोडेस्वार, शारदा घोडेस्वार यांचा मुलगा.