मीरा-भाईंदरमध्ये पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:18 AM2020-08-06T01:18:33+5:302020-08-06T01:18:43+5:30
घोडबंदर मार्ग पाण्याखाली : वाहतूक ठप्प, अनेक ठिकाणी वीज गायब
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये बुुधवारीही मुसळधार पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती कायम आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली. पाणी साचल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित केला. तळमजल्यांवर राहणाºया नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी आजही कायम असल्याने अनेकांच्या घरात अन्न शिजले नाही.
सोमवारी रात्रीपासून कोसळणारा पाऊस बुुधवारी सकाळपर्यंत जोरात होता. सायंकाळी पुन्हा वारा व पावसाने जोर धरला. रात्रभर पाऊस पडत असल्याने शहरातील झोपडपट्टी, गावठाण भागात तसेच इमारतींच्या तळ मजल्यांवर राहणाºया नागरिकांच्या घरातील पाणी जास्त वाढू लागले. मंगळवारपेक्षा जास्त पाणी बुधवारी साचले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून आजही पाण्याचे प्रचंड लोंढे काशिमीरा भागात आल्याने पाण्याला प्रचंड वेग होता .
घरात, दुकानात पाणी वाढल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. घरातील सामान - धान्य, इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात अन्न शिजले नाही. इमारतीत राहणाºया तळ मजल्यावरील नागरिकांना वरच्या मजल्यावरच्या शेजाऱ्यांनी आश्रय दिला. त्यातच पाणी साचल्याने खबरदारी म्हणून सकाळपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वाहने पाण्याखाली गेल्याने ती नादुरुस्त झाली असून आतील साहित्य खराब झाले आहे. शहरात झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. मीरा रोडच्या गौरव रेसिडेन्सीजवळील आंधळे गार्डन इमारतीची संरक्षक भिंत पडल्याने त्याखाली अनेक दुचाकी गाड्या सापडल्या. महापालिका व लोकप्रतिनिधींकडून मात्र पूरस्थितीकडे पाठ दाखवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
काशिमीरा उड्डाणपुलावर वाहने पडली अडकून
शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते पाणी साचल्याने ठप्प झाले होते. त्याचसोबत वरसावेनाका, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्गही कमरेएवढे पाणी साचल्याने बंद होता. काशिमीरा उड्डाणपुलावर तर वाहने अनेक तास अडकून पडली होती.