Join us

पावसाच्या धिंगाण्याने मुंबईकरांचे हाल; पालघरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, ठाण्यात संततधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 6:09 AM

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर असला तरी उर्वरित महाराष्ट्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीसह सोमवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांचे मेगाहाल झाले. रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याने मुंबईकरांचा आठवड्यातील पहिला दिवस पाण्यात गेला. सकाळच्या पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येते तोच सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांचे पुन्हा हाल सुरू केले. राज्यात विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.कोकण व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर असला तरी उर्वरित महाराष्ट्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यभरातदमदार पाऊस कोसळेल, अशी आनंदवार्ता हवामान खात्याने दिली आहे.मुंबईच्या सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक बसला. उपनगरी रेल्वेसेवादेखील विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे, पालघर, रायगडसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यालादेखील मुसळधार पावसाने झोडपले. तर अलिबागमध्ये सहा गावांचा संपर्क तुटला. कर्जतजवळ मालगाडी घसरल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. काही एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या तर लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळविण्यात आल्या होत्या.शॉक बसून एकाचा मृत्यूगोवंडी, शिवाजी नगर येथे शॉक लागून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद कय्युम अयुब काझी (३०) यांचा मृत्यू झाला.कोंडेश्वरला एक बुडालाअंबरनाथ येथील कोंडेश्वर धबधब्यात ठाणे येथील मनोरमानगर, ढोकाळी येथील रोशन मोरे (२१) हा युवक सोमवारी सायंकाळी बुडाला.आज अतिवृष्टीचा इशारामुंबई आणि उपनगरात येत्या २४ तासांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच २, ४ आणि ५ जुलै रोजी पालघर जिल्ह्यात तर, २ जुलै रोजीठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज आहे.नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळीपालघरमध्ये जोरदार पावसामुळे वैतरणा आणि सूर्या या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तानसा नदीवरील मेढे, पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला.

टॅग्स :मुंबई