मुंबईत विमानांची ये-जा रखडल्याने प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:29 AM2019-09-06T06:29:53+5:302019-09-06T06:30:03+5:30
इंडिगोचा गोंधळ मोठा; ३० फेऱ्या रद्द, ११८ विमानांना विलंब
मुंबई : पावसाचा जोर कमी झाला असला तरी गुरुवारी दुपारपर्यंत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून १६ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबईकडे येणारी १४ विमानेही रद्द झाली. याशिवाय ११८ विमानांना विलंब झाला. मुंबई विमानतळावरून रोज सुमारे एक हजार विमानांची ये-जा होते.
ज्या १८ विमानांना विलंब झाला, त्यापैकी ८६ मुंबईहून विविध ठिकाणी जाणारी होती. आता विमानांची ये-जा सुरळीत सुरू आहे, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र इंडिगोची विमाने विलंबाने येत व जात आहेत. त्याबद्दलची माहिती इंडिगो कंपनीच देईल, असेही या अधिकाºयाने सांगितले. इंडिगोची २० विमाने बुधवारी रात्री रद्द केली होती. जोरदार पावसामुळे सर्व कंपन्यांच्या मिळून ४५५ विमानांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर, इंडिगोचे अनेक अधिकारी व कर्मचारी पोहोचू न शकल्याने अनेक विमाने रद्द करण्यात आली, असे इंडिगोच्या अधिकाºयाने सांगितले.
प्रवाशांचा संताप
इंडिगोचे बुधवारी संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी जयपूरला निघणारे विमान प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी ६ वाजता निघाले. त्यामुळे प्रवासी सकाळी ८ वाजता जयपूरला पोहोचले. हे सारे प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून होते. मध्यरात्रीच्या सुमारात त्यांना विमानात नेण्यात आले. पण सकाळपर्यंत आम्ही विमानात बसून होतो. आम्हाला विमानात काही खायलाही देण्यात आले नाही. त्यामुळे सारेच प्रवासी चिडले. काहींनी तर विमानाबाहेर येऊ न गोंधळ घातला. त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांना तिथे बोलावण्यात आले, असे एका प्रवाशाने सांगितले.