- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वृक्षतोडी प्रकरणात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पासाठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळत असतानाच, दुसरीकडे याच प्रकल्पातील अंधेरी पूर्वेकडील प्रकल्पग्रस्तांना सेवा-सुविधांभावी यातना भोगाव्या लागत आहेत. वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी मेट्रो-३ च्या अंधेरी येथील प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडल्या असून, याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत पत्रव्यवहारही केला आहे, परंतु अद्याप यावर काहीच उपाय योजना करण्यात येत नसल्याची खंत गॉडफ्रे यांनी व्यक्त केली आहे.मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा देशातील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. मेट्रो-३ च्या कामाच्या सुरुवातीपासूनच या प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आसूड ओढले आहेत. मात्र, तरीही कॉर्पोरेशनने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. विशेषत: गिरगाव आणि काळबादेवी येथील प्रकल्पग्रस्तांनी मेट्रोला विरोध दर्शविल्यानंतर कॉर्पोरेशनकडून संबंधितांची मने वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. गिरगाव आणि काळबादेवी येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्यवस्थित व्हावे, यासाठी कॉर्पोरेशनकडून तेथे कार्यालय थाटण्यात आले असतानाच, आता अंधेरी पूर्वेकडील प्रकल्पग्रस्तांच्या समस्येने तोंड वर काढले आहे.गॉडफ्रे पिमेंटा यांनी या संदर्भात सांगितले की, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत चार महिन्यांपूर्वी सहार येथील शांतीनगरमधल्या १८२ प्रकल्पग्रस्तांना, अंधेरी-कुर्ला रोडवरील चकाला येथील ‘मूलगाव व्हिलेज’मधील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले, परंतु यांच्याकरिता बांधण्यात आलेल्या इमारतीला ‘ओसी’ नसल्याच्या कारणात्सव प्रकल्पग्रस्तांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुळात ‘ओसी’ नसताना, प्रकल्पग्रस्तांना इमारतीमध्ये स्थलांतरित करणे चुकीचे आहे. इमारतीमध्ये वास्तव्य करत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा होत नाही. परिणामी, संबंधितांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे, पाणी वाया जाऊ नये, याकरिता येथे पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पामध्ये व्यवस्थितरीत्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया होत नाही. परिणामी, हे पाणी वापरल्याने प्रकल्पग्रस्तांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: दूषित पाण्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आजार होत असून, यात केस गळणे आणि त्वचेला त्रास होणे, अशा आजारांचा यात समावेश आहे.- वॉचडॉग फाउंडेशनने घटनास्थळी दाखल होत, प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले असून, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी कॉर्पोरेशनसोबत पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, सदर इमारतीला महापालिकेची ‘ओसी’ नसल्याने, ती प्रथमत: देण्यात यावी आणि महापालिकेकडून प्रकल्पग्रस्तांना पाणीपुरवठा देण्यात यावा, असे म्हणणे गॉडफ्रे यांनी मांडले आहे.