मुंबई : शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरीच केली आहे. २६ जुलै २००५च्या पुराला आज १६ वर्षे उलटूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचे छप्पर, अशी स्थिती झाल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
राज्यातील पूरस्थिती, २६ जुलैच्या मुंबईतील पुराला १६ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. २६ जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. त्या पुराला आज १६ वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एवढी वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. त्यामुळे मुंबईची स्थिती ही ‘दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचे छप्पर’ अशी झाली आहे.
सरासरी २० हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी धरला तरी मुंबई पालिकेने मागील १६ वर्षांत ३ लाख २० हजार कोटींचा अर्थसंकल्पीय निधी खर्च केला. मात्र, इतका खर्च करून चित्र काय आहे, मग हे पैसे गेले कुठे? याचे उत्तर सत्ताधारी शिवसेनेला द्यावे लागेल, असे शेलार म्हणाले. चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचे काय झाले, असा प्रश्न करतानाच त्यावेळी चितळे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्यांचे काय झाले, मुंबईतील पाणलोट क्षेत्र मोजले का, मिठी नदीवरील अतिक्रमण हटवले का, पंपिंग स्टेशनचे काय झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधीशांना द्यावी लागणार आहेत, असेही शेलार म्हणाले.