Join us

‘मीटू’नंतर स्त्रियांची परिस्थिती जैसे थे - बर्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:14 AM

‘मीटू’नंतर स्त्रियांच्या जगण्यात किंवा समाजात काही बदल घडलेले नाहीत.

मुंबई : ‘मीटू’नंतर स्त्रियांच्या जगण्यात किंवा समाजात काही बदल घडलेले नाहीत. केवळ अभिव्यक्तीचा मोकळेपणा मिळाला, मात्र त्यामुळे स्त्रियांच्या व्यथा बदललेल्या नाहीत. कारण, सामाजिक स्थित्यंतरांना वेळ लागतो, बदल हळूहळू घडतात. समाजमाध्यमांतील ‘मीटू’ ही चळवळ उथळ असल्यामुळे यातून परिस्थिती बदलेल असे कधी जाणवले नाही.‘मीटू’पूर्वी महिला काम करत असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधातील तक्रार समित्या अस्तित्वात होत्या. त्यामुळे काही बदलायचे असेल तर यंंत्रणांनी या समित्यांचे कार्यस्वरूप तपासावे, या समित्या किती काम करत आहेत याची चाचपणी व्हायला पाहिजे. यातून काही कृतिशील हाती लागत आहे का, हे तपासून त्यादृष्टीने काम झाले पाहिजे. कारण समाज माध्यमांत व्यक्त होणे हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम आहे, मात्र याद्वारे कोणताही ठोस विचारप्रवाह, चळवळ, संघर्ष उभा राहू शकत नाही किंवा राहिलेला नाही. समाज माध्यमांत व्यक्त होणे हा ‘मीटू’चा भाग होता. मात्र व्यक्त झाल्यानंतर त्या व्यथेला काय दिशा मिळतेय? पुढे जाऊन या व्यथेचे निराकरण होतेय का? कित्येक वर्षांच्या अंतराने व्यक्त होणारी घुसमट शमते की तशीच राहते, हे पाहणे ही समाजाची खरी परीक्षा आहे. ‘मीटू’ची आणखी एक वाईट बाजू म्हणजे समाज माध्यमांत याची गंभीरताच राहिलेली नाही. ‘मीटू’नंतर समाजात चांगले बदल करण्यासाठी आपल्या यंत्रणा कमकुवत आहेत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या यंत्रणांनी अधिक सक्षमपणे काम केले पाहिजे. ‘मीटू’नंतर मानसोपचारतज्ज्ञांकडे प्रकरणे वाढली नाहीत. त्यामुळे व्यक्त होऊनही मार्ग न निघाल्याने बºयाच पीडितांच्या वाट्याला नैराश्य आले, अशी अनेक उदाहरणे असून ती समोर आलेली नाहीत. लहानपणापासून मुली वा स्त्रिया कुटुंबातील सदस्यांच्या अत्याचाराला बळी पडतात. त्यामुळे याही पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.

टॅग्स :जागतिक महिला दिनमहिला