Join us

शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरला मारहाण

By admin | Published: April 02, 2016 2:12 AM

शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेसंदर्भात गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा

मुंबई : शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेसंदर्भात गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील मेडिसिन विभागातील पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या डॉ. निहार देसाई या डॉक्टरना मारहाण झाली. कार्डिओमायोपॅथी या हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. बुधवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेचे १५ ते १६ नातेवाईक वॉर्डमध्ये आले. त्यांनी डॉ. देसाई यांच्याशी अरेरावी करून बोलायला सुरुवात केली. त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण केली. या वृत्ताला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दुजोरा दिला आहे. डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी अनेकदा शासनाशी संपर्क साधला आहे; पण, अजून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत, असे मत मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)