शिवडी - एलिफंटा रोपवेची मंजुरी अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 06:29 AM2019-08-14T06:29:41+5:302019-08-14T06:30:04+5:30
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुुंबई पोर्ट ट्रस्टच्या शिवडी-एलिफंटा रोपवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई : मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुुंबई पोर्ट ट्रस्टच्या शिवडी-एलिफंटा रोपवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याबाबत आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याची ग्वाही केंद्रीय नौकावहन मंत्रालयाला दिली आहे. पर्यटनमंत्र्यांची नुकतीच याबाबत नौकावहनमंत्र्यासोबत दिल्लीत बैठक झाली. त्यामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.
शिवडी व एलिफंटा यांना जोडणारा हा ८ किमी अंतराचा प्रस्तावित रोपवे पूर्ण झाल्यानंतर, समुद्रावरील जगातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे. युनेस्कोच्या हेरिटेज यादीत असलेल्या एलिफंटा येथील गुहांचे दर्शन घेणे पर्यटकांना यामुळे सहजसोपे होईल. याची उंची समुद्रसपाटीपासून ५० ते १२५ मीटरपर्यंत असेल. यासाठी ८ ते १० टॉवर समुद्रात उभारण्यात येणार आहेत. हा प्रवास सुरक्षित व वेगवान व्हावा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याचा वेग ८ मीटर प्रति सेकंद असेल व कमान १५ मिनिटांत एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाणे शक्य होईल. केबिनमध्ये प्रवाशांची क्षमता २० ते ३५ पर्यंत असेल. मुंबईतील जलपर्यटनाच्या आकर्षणाचा हा केंद्रबिंदू ठरेल व त्यामुळे पर्यटनाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
असा असेल प्रस्तावित रोपवे
शिवडी व एलिफंटा यांना जोडणारा हा रोपवे ८ किमीचा असेल.
याची उंची समुद्रसपाटीपासून ५० ते १२५ मीटरपर्यंत असेल.
यासाठी ८ ते १० टॉवर समुद्रात उभारण्यात येणार आहेत.
सुरक्षित प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.