Join us

शिवडीत सेना-मनसेत कलगीतुरा

By admin | Published: May 02, 2017 3:51 AM

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असलेल्या शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास जमीन हस्तांतरण प्रक्रियेमुळे रखडला आहे.

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असलेल्या शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास जमीन हस्तांतरण प्रक्रियेमुळे रखडला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतीच, केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि काही क्षणातच स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावर शिवडी बीडीडीसंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे जुने फोटो पोस्ट केले. परिणामी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत श्रेय वादावरून चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.या आधी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, नायगाव आणि ना. म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन केले होते. मात्र, शिवडी येथील बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने, येथील भूमिपूजन सोहळा लांबणीवर पडला आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडी उप-विभागाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी पोर्ट ट्रस्टकडे पत्रव्यवहार केल्यानंतर, जमीन हस्तांतरणासाठी अद्याप जमीन धोरण धोरण निश्चित झाले नसल्याचे उत्तर प्रशासनाने धाडले होते. त्यावर मनसेच्या शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेत, तत्काळ जमीन धोरण जाहीर करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यावर गडकरी यांनीही सकारात्मक आश्वासन दिल्याचा दावा मनसेने केला आहे.मनसेच्या शिष्टमंडळाने गडकरी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताच, सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही गडकरी यांची भेट घेतल्याचे जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या पोस्टमध्ये सावंत यांनी केलेला पत्रव्यवहार आणि त्यावर गडकरी यांनी जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सावंत यांनी केलेल्या पोस्टनंतर, बीडीडी चाळींमध्ये कमालीची चर्चा सुरू झाली आहे. सेना आणि मनसे या दोघांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कोण वरचढ ठरणार? हे लवकर कळेलच. मात्र, लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत वरचढ ठरलेल्या सेनेवर मात करण्यासाठी, मनसेने पुन्हा एकदा सुरुवात केल्याचे चित्र समोर आले आहे. (प्रतिनिधी)