रखडलेल्या थीम पार्कसाठी शिवसेनेची धावाधाव
By admin | Published: February 27, 2016 03:23 AM2016-02-27T03:23:02+5:302016-02-27T03:23:02+5:30
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार दरबारी रेंगाळल्यामुळे शिवसेनेने आता न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत संधी साधली आहे़
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार दरबारी रेंगाळल्यामुळे शिवसेनेने आता न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत संधी साधली आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यवर्ती उद्याने उभारण्याच्या दृष्टीने महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणण्यास सेनेने सुरुवात केली आहे़
मे़ गॅलॉप्स या उपाहारगृहाला पोटभाडेकरू म्हणून रेसकोर्सची जागा देऊन रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब या भाडेकरूने पालिकेच्या कराराचा भंग केला़ यामुळे मक्त्याचा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आल्यानंतर शिवसेना-भाजपाच्या विरोधामुळे पालिकेने टर्फ क्लबच्या कराराचे नूतनीकरण केलेले नाही़ या रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवला होता.
मात्र राज्यात युतीची सत्ता आल्यानंतरही शिवसेनेला या थीम पार्कचे स्वप्न साकार करता आलेले नाही़ मित्रपक्ष भाजपानेच हा प्रस्ताव अडकवून ठेवल्यामुळे शिवसेनेची पुरती गोची झाली आहे़ अखेर त्यांच्या मदतीसाठी उच्च न्यायालय धावून आले आहे़ हरितपट्ट्यांचे संरक्षण करण्यात पालिका अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मध्यवर्ती उद्याने उभारण्याची सूचना न्यायालयाने नुकतीच केली आहे़ (प्रतिनिधी)
सभागृह नेत्यांचे दबावतंत्र
न्यायालयाच्या आदेशामुळे शिवसेनेला पुन्हा बळ आले असून हा प्रकल्प आगामी निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्यासाठी शिलेदार कामाला लागले आहेत़ सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत पत्र लिहून आयुक्त अजय मेहता यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्मरण करून दिले आहे़
महालक्ष्मी रेसकोर्सचा पाच लाख ९६ हजार ९५३ चौ़ मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा असून दोन लाख ५८ हजार २४५ चौ. मीटर जागेवर पालिकेचा हक्क आहे़
१८८३ मध्ये कुश्रो एन वाडिया यांनी ही २२५ एकर जागा पालिकेला दान केली़ मेलबर्नमधील कोलफिल्ड रेसकोर्सच्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्स तयार झाले़
१९१४ मध्ये पालिकेने ही जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ९९ वर्षांच्या भाडेकरारावर दिली़ हा करार ३१ मे रोजी संपुष्टात आल्यानंतर ३० वर्षांची मुदतवाढ मिळण्याची विनंती क्लबचे अध्यक्ष कुश्रो धुनजीभॉय यांनी केली आहे़