फॉरेन्सिक विभागाकडे साडेसहा हजार ‘ डीएनए’चे अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:50+5:302021-09-21T04:06:50+5:30
फॉरेन्सिक विभागाकडे साडेसहा हजार डीएनएचे अहवाल प्रलंबित विविध गुन्ह्याचे तपास रखडले, अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका जमीर काझी : ...
फॉरेन्सिक विभागाकडे साडेसहा हजार डीएनएचे अहवाल प्रलंबित
विविध गुन्ह्याचे तपास रखडले, अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका
जमीर काझी : लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध गुन्ह्यांच्या शास्त्रोक्त व तांत्रिक पुराव्याच्या तपासासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये तब्बल ६ हजार ४५१ डीएनए तपासणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या ५ वर्षांत अपुरे मनुष्यबळ व सामग्रीमुळे या प्रकरणांचे अहवाल प्रशासनाला बनवता आलेले नाहीत. त्याच्या पूर्ततेअभावी महिलांवरील अत्याचारासह विविध गंभीर गुन्ह्याचा तपास रखडला आहे.
राज्यात घडणाऱ्या विविध स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याची उकल तंत्रशुद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय कार्यरत करण्यात आले आहे. महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कामकाज चालवले जाते. त्यांच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शरीरासंबंधी (बॉडी ऑफेन्स) गुन्ह्याच्या छडा लावण्यासाठी तसेच सबळ पुरावा म्हणून अनेकवेळा मृतदेह, आरोपी, संशयित, फिर्यादी आदींचे डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले जातात. गेल्या ५ वर्षांत डीएनएसाठी दाखल व प्रलंबित प्रकरणांचा अहवाल ''लोकमत'' च्या हाती लागला आहे. त्याच्या वर्षनिहाय आढाव्यातून अनेक प्रकरणे तपासणीविना रखडल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपुऱ्या मनुष्यबळामुळे विविध प्रकरणे निष्कर्षशिवाय प्रलंबित आहेत. सध्या राज्यात विविध २१ ठिकाणच्या लॅबमध्ये डीएनए चाचणीचे अहवाल तपासण्याची सुविधा आहे. याठिकाणी या वर्षाच्या सुरुवातीला एकूण ५६५९ डीनएचे अहवाल प्रलंबित होती. जुलैपर्यंत त्यामध्ये ३,८२३ प्रकरणे नव्याने वाढली तर ३०३१ डीएनएचे रिपोर्ट पाठविण्यात आली. आतापर्यंतच्या एकूण ९ हजार ४८२ प्रकरणांपैकी ६ हजार ४५१ डीएनए चाचणी प्रकरणाच्या अहवालाची पूर्तता अद्याप केलेली नाहीत. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासाला अंतिम निष्कर्ष काढता आलेला नाही.
(उद्याच्या अंकात वाचा : लैगिंक अत्याचार व पोक्सोच्या गुन्ह्यातील डीएनए रिपोर्ट प्रलंबित)
------------
पाच वर्षांतील डीएनए अहवालाची प्रकरणे
वर्षे नवीन प्रकरणे एकूण रिपोर्ट शिल्लक या क्रमाने)
२०१७ ५११३ ७५४९ २९९३ ४५५६
२०१८ ६२५९ १०,८१५ ७५२३ ३२९२
२०१९ ७५४० १०८३२ ५४९१ ५३४१
२०२० ५३४१ ६३१४ ११,६५५ ५९९६
२०२१ ३८२३ ९४८२ ३०३१ ६४५१