पक्षांतर केलेले सहा नगरसेवक एसीबीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:26 AM2017-10-27T06:26:38+5:302017-10-27T06:27:15+5:30
मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना लवकरच एसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना लवकरच एसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांच्याकडे बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सखोल चौकशी व्हावी यासाठी मनसेच्या वतीने नगरसेवक संजय तुर्डे यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने चौकशीला सुरुवात केली आहे.
पालिका निवडणुकीत मनसेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या मनसे नगरसेवक परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे सहाही जण एसीबीच्या रडारवर आहेत.
तुर्डे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी प्रभाग समितीच्या बैठकीनंतर शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांनी शिवसेनेत येण्यासाठी चांगली कारकिर्द घडविण्याचे आमिष दाखविले. मात्र मी त्यास नकार देऊन तेथून निघून गेलो. मात्र त्यांच्यासह सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. या गेल्या काही महिन्यांत त्यांच्याकडील संपत्तीत वाढ झाल्याचे समजले. त्यांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा पक्षाला संशय आहे. याबाबतचे काही पुरावेदेखील एसीबीकडे सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणी १८ तारखेला एसीबीकडे आॅनलाइन तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी एसीबीने जबाब नोंदवून घेतल्याचेही तुर्डे यांनी सांगितले. वरील घटनाक्रमाचा उल्लेखही जबाबात करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पक्षाच्या वतीने एसीबीकडे करण्यात आल्याचे तुर्डे यांनी सांगितले.
तुर्डे यांच्या तक्रारीवरून एसीबीने अधिक तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या नगरसेवकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी भाजपा खासदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. या प्रकारामुळे भाजपा, शिवसेना आणि मनसेत जुंपलेली दिसून येत आहे. मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांनीही भाजपा खासदाराची खिल्ली उडवित त्यांच्याविरुद्ध गुरुवारी एसीबी अपर पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी केलेले आरोप खोटे असून, आपण कुठल्याची चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हेच पत्र त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केले आहे.
>लांडे यांनी आरोप फेटाळले
लांडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी त्यांच्यासह सहाही नगरसेवकांवर केलेले आरोप फेटाळून लावले. तसेच पुन्हा मनसेत जाण्याची चर्चा ही अफवा असून, शिवसेनेतून कुठेही जाणार नसल्यावर शिक्कामोर्तब केले; शिवाय एसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.