मुंबई : डॉक्टर झालेल्या भावाचे अभिनंदन करण्यासाठी निघालेल्या डॉ. दीपाली लहामटे (२५) यांना २४ मार्च रोजी भरधाव कारने धडक दिली. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर सहाव्या दिवशी ‘तिची’ मृत्यूशी झुंज संपली.अहमदनगरची दीपाली ही नायर दंत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. २४ मार्चला मरिन लाइन्स येथील जिमखान्यात तिच्या भावाचा पदवीदान सोहळा होता. या सोहळ्यात भावाचे अभिनंदन करण्यासाठी दीपाली निघाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास मोबाइलवर बोलत मरिन लाइन्स येथील एन.एस. रोड सिग्नल क्रॉस करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला धडक दिली. चालक लगेच फरार झाला. स्थानिकांच्या मदतीने तिला सुरुवातीला खासगी रुग्णालयात, त्यानंतर जे.जे. दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी यझडी अस्पी यांच्या जबाबावरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी शिखा झवेरीविरुद्ध हिट अॅण्ड रन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिखाला अटक करत तिची जामिनावर सुटकाही झाली.दोषींना शिक्षा मिळावीयेत्या आॅगस्टमध्ये तिची इंटर्नशिप पूर्ण होणार होती. माझ्या पदवीदान सोहळ्यासाठी तिने खास ग्रीटिंग बनविले होते. तिच्यासोबत जे झाले तसे कुणासोबत होऊ नये असे वाटते. यातील दोषींना योग्य शिक्षा मिळावी असे वाटते.- डॉ. अभिनव लहामटे,दीपालीचा भाऊमित्रमैत्रिणींची ‘तिच्या’साठी मोहीमनायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज स्टुडंट असोसिएशनच्या वतीने ‘जस्टीस फॉर दीपाली’, ‘थिंक अँड ड्राइव्ह’ अशा हॅशटॅगने मोहीम सुरू केली होती. या माध्यमातून या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी समोर यावे आणि मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत होते.सदोष मनुष्यवधाचा गुन्हाकारचालक शिखा झवेरीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.दीपालीच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. शिवाय, खूप रक्तस्राव झाला होता. तिची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी तिचा रक्तदाबही स्थिर नसल्याने अवयवदान करता आले नाही.- डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, जे.जे. रुग्णालय
सहा दिवसांनी ‘तिची’ मृत्यूशी झुंज संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:22 AM