खोपोली-कर्जत दरम्यान सहा दिवस मेगाब्लॉक; शेवटची CSMT-खोपोली लोकल १०.२८ वाजता
By नितीन जगताप | Published: December 22, 2023 11:25 PM2023-12-22T23:25:32+5:302023-12-22T23:28:17+5:30
रात्री १२.३०ची खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे
नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्या पळसधरी ते खोपोलीदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून (ता. २३) पुढील सहा दिवस दररोज रात्री तीन तासांच्या वाहतूक मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक २९ डिसेंबरपर्यत असणार आहे. त्यामुळे रात्री १२.३०ची खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे. तर काही सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या खोपोली लोकल कर्जत स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पळसधरी ते खोपोली दरम्यान लोकलसह मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या अतिरिक्त वेग वाढवण्यासाठी पायभूत सुविधांचे कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार शनिवारी- रविवारी मध्य रात्रीपासून पुढील सहा दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यत दररोज मध्यरात्री १.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यत विशेष वाहतूक मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे खोपोलीहून सुटणारी रात्री १२.३० खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे. तर, सीएसएमटी स्थानकातून सुटणारी रात्री ११.१८ वाजताची सीएसएमटी- खोपोली लोकल सहा दिवस कर्जत पर्यत धावणार आहे. तसेच आजपासून खोपीलीसाठी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची लोकल रात्री १०.२८ वाजता सुटणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते खोपीली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील सहा दिवस लोकल पकडण्यासाठी कार्यालयातून लवकर निघावे लागणार आहे.