मुंबईसह ठाणे परिसरातून ५४ अजगरांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:37 AM2019-08-01T02:37:40+5:302019-08-01T02:37:52+5:30
रॉ संस्थेने मुलुंड, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, ठाणे आणि कल्याण या ठिकाणांहून २२ अजगरांना सोडवले.
सागर नेवरेकर
मुंबई : जुलै महिन्यात मुंबईसह ठाणे परिसरातून ५४ अजगरांची मानवी वस्तीतून सुटका करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मुंबईतल्या प्राणिमित्र संस्थांपैकी सर्प संस्थेने २०, रॉ संस्थेने २२, ‘पॉज’ने ६ तर ‘डब्ल्यू डब्ल्यू ए’ या संस्थेने ६ अशा एकूण ५४ अजगरांची जुलै महिन्यात सुटका करण्यात आली. या वर्षी सर्वाधिक अजगर मानवी वस्तीत आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
रॉ संस्थेने मुलुंड, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, ठाणे आणि कल्याण या ठिकाणांहून २२ अजगरांना सोडवले. सर्प संस्थेने बोरीवली, मालाड (आप्पापाडा), कांदिवली (क्रांतीनगर) घोडबंदर रोड, दहिसर, मीरा रोड यादरम्यान २० अजगरांना ताब्यात घेतले. डब्लू डब्ल्यू ए संस्थेने भांडुप कॉम्प्लेक्समधून २ फूट, योगी हिल (मुलुंड) अडीच फूट, मुलुंड कॉलनी दोन फूट, हनुमान नगर (ठाणे) दीड फूट आणि येऊर येथून ९ फूट लांबीच्या अजगरांची सुटका करण्यात आली. पॉज (मुंबई) संस्थेने भांडुप पश्चिमेकडील साई हील येथून ८ फूट, मुलुंड (पश्चिम) दीड फूट, गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशीमधून साडेपाच फूट, बोरीवली पूर्वेकडील दौलत नगर परिसरातून ८ फूट, घाटकोपर पश्चिमेकडील आॅर्चिड कम्पाउंडमधून साडेसहा फूट, मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्ग येथून पाच फूट लांबीच्या अजगरांना ताब्यात घेतले.
प्राणिमित्र संस्थेच्या स्वयंसेवकांनी जुलै महिन्यात ताब्यात घेतलेल्या सर्व अजगरांची प्रकृती स्थिर असून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले, असे सर्पमित्रांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागातून पाण्याच्या प्रवाहातून वाहत अजगर मानवी वस्तीमध्ये येतात. तसेच नाल्यामध्ये सर्वांत जास्त अजगर आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता अजगर दिसून आल्यास त्वरित प्राणिमित्र संस्थांना किंवा सर्पमित्र तसेच वनविभागाला माहिती द्यावी. अजगरांना मारण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.