Join us

कांजूरमार्गमधील सिने विस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 8:30 PM

कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिनेविस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे.

मुंबई- कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिने विस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली असून आग पूर्णपणे विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवायला फायर ब्रिगेडला यश आलं आहे. स्टुडिओला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सिने विस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरूनही आग दिसत होती.

बेपनहा या मालिकेचं शूटिंग सुरू असताना सिने विस्टा स्टुडिओला आग लागली. स्टुडिओमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असवी, अशी माहिती सध्या समोर येते आगेय 'शनिवारी संध्याकाळी आठ वाजता स्टुडिओला आग लागली. सात फायर ब्रिगेडच्या गाड्या व चार वॉटर टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. 

 

 

 सिनेविस्टा स्टुडिओमध्ये अनेक मालिकांचं शूटिंग होतं असतं. पाच एकर जमिनीवर सिनेविस्टा स्टुडिओ बांधण्यात आला आहे. या स्टुडिओमध्ये मालिकांसाठी तयार केलेले काही तात्पुरते तर काही कायमस्वरूपी असे सेट्स असून तीसपेक्षा जास्त शूटिंग लोकेशन्स आहेत. मालिका व सिनेमाच्या शूटिंगसाठी लागणारे कॅमेरे, लाइट्स अशा विविध साहित्याचं मोठं हबही या स्टुडिओमध्ये आहे.