पश्चिम उपनगरात वेश्याव्यवसायातून ६ मुलींची सुटका
By admin | Published: June 3, 2016 02:12 AM2016-06-03T02:12:28+5:302016-06-03T02:12:28+5:30
समाजसेवा शाखेने चेंबूर, अंधेरी आणि खार परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये ६ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत तब्बल २५ जणांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई : समाजसेवा शाखेने चेंबूर, अंधेरी आणि खार परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये ६ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत तब्बल २५ जणांवर कारवाई करण्यात आली.
अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेचे उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत ४ तरुणींची सुटका करत तीन दलाल महिलांविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ चेंबूर पूर्वेकडील अजिंक्य तारा सोसायटीत समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईत २ मुलींची सुटका करत एका दलाल महिलेला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी २२ हजार रुपये जप्त केले.
हे धाडसत्र सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खार परिसरातील नीलम बारमध्ये विनापरवाना छम छम सुरू होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी आपला मोर्चा तेथे वळविला. बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्यावर पडदा पाडत तपास पथकाने २१ जणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच तेथील बारबालांची सुटका केली. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)