- मनोहर कुंभेजकर, मुंबईमुंबईत मराठी टक्का आता २२ टक्के राहिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेनेने इतर जाती-धर्माच्या नागरिकांना जवळ केले आहे. मराठी उमेदवारांबरोबर गुजराती, दाक्षिणात्य, राजस्थानी आणि विविध जाती-धर्माच्या उमेदवारांना मुंबईतून शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. मावळत्या पालिकेत दहिसर विधानसभेतील शिवसेनेच्या हंसाबेन देसाई या एकमेव गुजराती समाजाच्या नगरसेविका होत्या. बोरीवली (प.) विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १५मधून परेश सोनी, प्रभाग १८मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सेनेत आलेल्या नगरसेविका आणि गुजराती समाजाच्या संध्या विपुल दोशी यांना उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५४ हजारांपैकी २२ हजार गुजराती मतदार असलेल्या प्रभाग ५५मधून गुजराती समाजाचे बिरेन लिम्बाचिया यांना उमेदवारी दिली आहे. ते गोरेगाव मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कट्टर समर्थक आहेत. मुंबईत २२ टक्के गुजराती समाज असून, २६ मतदारसंघांत गुजराती समाजाचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे मोदींच्या नोटाबंदीविरोधात नाराज असलेला मुंबईतील गुजराती समाज या वेळी सेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहील, असा दावा शिवसेनेचे गुजराती समाजाचे नेते हेमराज शाह यांनी केला आहे.प्रभाग ६१मधून माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या महिला विभाग संघटक राजुल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातच्या त्या शिवसेनेच्या संपर्कप्रमुखदेखील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी निवडणूक अर्ज चुकीचा भरल्यामुळे त्यांचा निवडणूक अर्ज बाद तर झालाच; मात्र येथून शिवसेनेला उमेदवारदेखील उभा करता आला नाही. प्रभाग १३१मधून मंगल भानुशाली या गुजराती समाजाच्या सहा उमेदवारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली. प्रभाग ५०मधून शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख आणि दक्षिणात्य असलेले दिनेश राव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रभाग ६४मधून शाखाप्रमुख हारून खान यांच्या पत्नी शायदा खान यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. हारून खान हे गेली १६ वर्षे शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे फळ मिळाल्याची भावना शायदा खान यांनी व्यक्त केली.
सेनेने दिले सहा गुजराती उमेदवार!
By admin | Published: February 03, 2017 3:45 AM