मुंबई- मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयने शुक्रवारी सहा तास चौकशी केली. यादरम्यान त्यांचा जबाबही नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फोनवर धमकावल्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंह यांनी आपल्याविरुद्धचा तपास मागे घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकपदी असलेल्या पांडे यांचे संभाषण उघड केले होते. ज्यामध्ये कथितपणे पांडे यांनी सिंह यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले. याच प्रकरणी शुक्रवारी सीबीआयने पांडे यांची चौकशी केली.