पत्रीपूल पाडण्याकरिता सहा तासांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 05:11 AM2018-12-16T05:11:40+5:302018-12-16T05:12:28+5:30
कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला रविवार, १८ नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाला आहे.
डोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला रविवार, १८ नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. पूल पाडण्यासाठी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द होणार आहेत. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबतचे नियोजन उपलब्ध न केल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस व एसटी महामंडळ यांना वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करणे अशक्य झाले आहे. रेल्वेच्या लेटलतिफीमुळे पर्यायी वाहतुकीचे नियोजन झाले नाही, तर प्रवाशांना रविवारी मेगाहाल सहन करावे लागणार आहेत.
पत्रीपूल पाडण्यामुळे डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यादरम्यान आणि कल्याण ते कर्जत-कसारा यादरम्यान वाहतूक सुरू राहील. डोंबिवली ते कल्याणदरम्यानची वाहतूक बंद असल्यास लोकांना रस्त्याने कल्याण किंवा डोंबिवली स्थानक गाठावे लागेल. त्यावेळी पत्रीपूल पाडण्याचे काम सुरू असेल, तर सध्या ज्या नवीन अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे, तो तरी सुरू ठेवणे शक्य होईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. समजा, हा नवीन पूल सुरू असेल, तर त्यावर प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे. केडीएमसी, वाहतूक पोलीस यांना रविवारी महामेगाब्लॉकच्या काळात तेथील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. परंतु, रेल्वेकडून नियोजन प्राप्त होत नसल्याने महापालिका, वाहतूक पोलीस तसेच अतिरिक्त बस सोडणाऱ्या एसटी महामंडळाला आपले नियोजन करणे अशक्य झाले आहे.
दरम्यान, आता पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे रविवारी सकाळी ९.३० पासून सहा तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात या पुलाचा लोखंडी सांगाडा काढण्यात येईल. परंतु, या ब्लॉकमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी असून बाहेरगावी गेलेले अनेक कल्याण, डोंबिवलीकर रविवारी परत येण्याची शक्यता आहे. तसेच सुटीच्या दिवशी फिरायला बाहेर पडणाºयांचेही नियोजनाच्या सावळ्यागोंधळामुळे प्रचंड हाल होण्याची शक्यता दिसत आहे.