मुंबई - अलीकडे काँक्रीटीकरण वाढत असून झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे बिबटे, साप आदी वन्यजीव शहरी भागात आढळून येत आहे. वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) या गजबजलेल्या परिसरातील आयकर विभागाच्या कार्यालयामागील रस्त्यावर साडे सहा फुटाचा अजगर आढळून आला आहे. दरम्यान, तात्काळ सर्प मित्राला संपर्क साधण्यात आला आणि सर्प मित्रांनी येऊन अजगराला पकडले. हा अजगर साडे सहा फुट लांबीचा आहे. मात्र हा अजगर वनविभागाकडे देण्यात येणार असून या अजगराची वैद्यकीय चाचणी करुन हा अजगर पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वांद्रा कुर्ला संकुलाच्या रस्त्यावर अजगर आढळला. सलग चार दिवस पाऊस पडल्यामुळे या अजगराच्या बिळामध्ये पाणी साचल्याने हा अजगर रस्त्यावर आला असल्याची माहिती सर्प मित्रांकडून देण्यात आली आहे.