मुंबई : इराण मधून मुंबईत आलेल्या ४४ भारतीय नागरिकांची कॉरंन्टाइन प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ गावी श्रीनगर व लडाखला पोचवण्यात आले. इराणमधून १३ मार्च रोजी आणलेल्या चव्वेचाळीस जणांना भारतीय नौदलाच्या घाटकोपर येथील मटेरिअल ऑर्गनायजेशन कॅम्पसमध्ये कॉरन्टाइन करण्यात आले होते. त्यामध्ये चौवीस महिलांचा समावेश होता. या नागरिकांनी ३० दिवस कॉरंन्टाइनमध्ये राहण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर१३ मार्च रोजी आणल्यानंतर त्यांना २८ मार्चपर्यंत तिथेच ठेवण्यात आले व त्यांची कोविड १९ची पुन्हा तपासणी करण्यात आली त्याचे अहवाल नकारात्मक आले.नौदलाच्या वैद्यकीय पथकातील अधिकारी या नागरिकांच्या दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यांच्या जेवणाची विशेष काळजी घेतली गेली.वाचनालय, टीव्ही, इनडोअर गेम्स, छोटी व्यायामशाळा व मर्यादित प्रमाणात क्रिकेट अशा विविध सुविधा नौदलातर्फे त्यांना पुरवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये देखील त्यांना सर्व सुविधा सुरळीतपणे पुरवण्यात आल्या.लॉकडाऊनमुळे त्यांना श्रीनगर व लडाख ला जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सी-१३० या विशेष विमानाने त्यांना १२ एप्रिल रोजी मुंबईतून श्रीनगरला नेण्यात आले.तिथून घरी जाईपर्य त्यांना पॅकेज फूड देण्यात आले. त्याशिवाय हाताने शिवलेले प्रत्येकी दोन मास्क देखील देण्यात आले. भारतीय नौदलाने केलेल्या आदरातिथ्याने हे प्रवासी अतिशय भारावून गेले व नौदलाच्या प्रति त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. कोविड १९ शी लढण्यामध्ये केंद्र व राज्य सरकार, प्रशासनासोबत नौदल सज्ज असून सर्व शक्य ती मदत केली जात असल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महिन्याभराच्या नौदलाच्या कॉरंन्टाइन आदरातिथ्यानंतर इराणमधून आलेले ४४ भारतीय हवाई दलाच्या विमानाने श्रीनगरला पोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:02 PM