Tardeo Fire: ताडदेवच्या अग्नितांडवात सहा ठार; कमला बिल्डिंगमधील २४ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 05:06 AM2022-01-23T05:06:13+5:302022-01-23T05:07:08+5:30

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी, १९ व्या मजल्यावर आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

six killed and 24 injured in kamla building at tardeo fire | Tardeo Fire: ताडदेवच्या अग्नितांडवात सहा ठार; कमला बिल्डिंगमधील २४ जण जखमी

Tardeo Fire: ताडदेवच्या अग्नितांडवात सहा ठार; कमला बिल्डिंगमधील २४ जण जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ताडदेव परिसरातील नाना चौकाजवळ असणाऱ्या कमला या २० मजली इमारतीत शनिवारी सकाळी ७:३०च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये इमारतीतील ६ रहिवाशांचा मृत्यू झाला, तर एकूण २४ जण जखमी झाले. 

कमला इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या व आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागल्याने या मजल्यावरील तीन ते चार फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इमारतीच्या १५व्या मजल्यापासून २०व्या मजल्यापर्यंत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने संपूर्ण इमारत रिकामी करत रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या आगीत जखमी झालेल्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर १७ जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अरविंद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आग दुपारी १२.३० च्या सुमारास आटोक्यात आली.

मृतांची नावे : १) हितेश मिस्त्री (४०) भाऊ, २) मौसमी मिस्त्री (४५) बहीण, ३) मीना मिस्त्री (६५) आई, ४) पुरुषोत्तम चोपडेकर (४२), ५) मंजुबेन कंथारिया (७५) ६) अनोळखी इसम

राज्याकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख

या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहा रहिवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारमार्फत दिली जाणार आहे, तर जखमींवर पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.

केंद्राकडूनही नातेवाइकांना मदत

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला, तसेच नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अनोळखी मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी

हितेश मिस्त्री यांच्या घराला आग लागली आणि तेथून ती मजल्यावरील सर्वच घरांत पसरली. आगीमध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात पाच जणांची ओळख पटली आहे, तर सहावा मृतदेह हा किरीट कंथारिया या स्थानिकाचा असल्याचा संशय असून, त्याची ओळख पटविण्यासाठी आम्ही डीएनए चाचणी करणार आहोत. - रामप्यारे राजभर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गावदेवी

आग आणि धुराने अडवली वाट 

इमारतीला आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घाबरलेल्या रहिवाशांना धीर दिला. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. १५व्या मजल्यापासून २०व्या मजल्यापर्यंत ही आग भडकली. आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून बाहेर पडणे कठीण जात होते.
 

Web Title: six killed and 24 injured in kamla building at tardeo fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.