मुंबई - महाराष्ट्राच्या हातून निसटलेल्या आणखी एका मोठ्या प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. तसेच सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारविरोधात विरोधक आणि विविध क्षेत्रातून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्या दाव्यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा तपशील द्यावा, नाही तर पोगो बघण्या इतपतच वकूब असल्याचे मान्य करावे, असे आव्हान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अतुल भातखळकर म्हणाले की, टाटा एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्प आहे. आदित्य ठाकरे म्हणताहेत की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ६ लाख कोटींची गुंतवणूक आणली. हा दावा म्हणजे बावळटपणाचा कडेलोट आहे. सहा लाख कोटी म्हणजे सहावर किती शून्य हे तरी त्यांना माहीत आहे का? तुम्ही नाईट लाईफ आणि पेग्विनवर बोला तेवढाच विषय तुम्हाला झेपणारा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
तसेच ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा तपशील द्यावा, नाही तर पोगो बघण्याइतपतच वकूब असल्याचे मान्य करावे. गुंतवणूक आणणे वाझे पाळून वसुली करण्याइतके सोपे नसते, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर टाटा एअरबसह आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे समोर आले होते. हा प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेला, असा सनसनाटी आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीने अडीच वर्षांमध्ये राज्यात सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणुक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता.