Join us

भाईंदरपासून वसईला जोडणार सहा पदरी पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 3:17 AM

एमएमआरडीए करणार बांधकाम; मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा भाग

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता भार्इंदर पश्चिमेकडून वसई पश्चिमेला जोडणारा सहा पदरी पूल बांधणार आहे.भविष्यातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन भार्इंदर पश्चिमेकडून वसई पश्चिमेला जोडणाऱ्या सहा पदरी पुलासंदर्भात नवीन सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानुसार हा पूल कसा असावा याबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमएस स्टूप’ या सल्लागाराची नेमणूक करण्यात आल्याचे एमएमआरडीने स्पष्ट केले.अनेक ठिकाणी चालकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील कोंडी सोडविण्यासाठी भार्इंदरपासून वसईला जोडणारा नवा पूल बांधण्यात येईल. हा पूल म्हणजे विस्तारित मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा (एमयूटीपी) एक भाग असेल. हा पूल सहा पदरी असून ४.९८ किमी लांब आणि ३०.६० मीटर रुंद आहे. १५०१.१६ कोटी रुपये इतकी या पुलाची अंदाजे किंमत आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.