आयपीएस अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीला सहा महिन्यांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:00+5:302021-07-16T04:06:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षातील वार्षिक वैद्यकीय तपासणीला सहा महिन्यांची मुदतवाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गत आर्थिक वर्षातील वार्षिक वैद्यकीय तपासणीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत आपली तपासणी करून सरकारला अहवाल पाठविण्याची मुभा आहे.
केंद्रीय सेवेत कार्यरत असलेल्या सनदी अधिकाऱ्यांची दरवर्षी आर्थिक वर्षात एक वेळा पूर्ण वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असते, त्यांचा फिटनेस, गंभीर व्याधीबाबत विहित नमुन्यात माहिती सादर करावी लागते. त्यासाठी त्यांना एकदिवसाची पगारी रजा मंजूर करण्यात येते. गेल्या वर्षी जानेवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झाला. या संसर्गाची अनेकांना लागण झाली आहे, दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे २०२०-२१ या वर्षांतील वैद्यकीय तपासणीसाठी ३० जूनपर्यंत असलेली मुदत ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी आयपीएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याला मान्यता देण्याचा निर्णय गृह विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.