Join us

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली असून, याबाबतचे शासन आदेशदेखील निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली. यामुळे तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलावांची चालू वर्ष सन २०२१-२२ची तलाव ठेका रक्कम व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठीची मुदत ३१ मेपासून पुढे सहा महिने वाढविण्यात आली आहे. तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्टी रक्कम व पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी १ टक्के व ०.५ टक्के क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्राची ठेका रक्कम भरण्यासाठीची मुदतही सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.