मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती वाढत असल्याचे सकारात्मक चित्र २०१६ मध्ये दिसून येत आहे. २०१५ मध्ये वर्षभरात ४१ व्यक्तींनी अवयवदान केले होते. यंदा जानेवारी ते ८ जुलैपर्यंत एकूण ३१ जणांनी अवयवदान केले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील विक्रमी अवयवदान यंदाच्या वर्षात होईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांंनी व्यक्त केला आहे. ७ जुलै रोजी लीलावती रुग्णालयातील रुग्णाने अवयवदान केल्यामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले. या रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले. हृदय फोर्टिस रुग्णालयातील ५३ वर्षीय पुरुषास प्रत्यारोपित करण्यात आले आहे. लीलावती ते फोर्टिस रुग्णालय २४ किमी इतके आहे. ग्रीन कोरिडोर करून अवघ्या २० मिनिटांत हृदय फोर्टिस रुग्णालयात आणले गेले. सकाळी ११.४० ते दुपारी १२.०४ या वेळात रुग्णवाहिका हृदय घेऊन रुग्णालयात पोहोचली. यकृत ग्लोबल रुग्णालयातील दोन रुग्णांना देण्यात आले आहे. एका ८ वर्षांच्या मुलाला आणि ५१ वर्षीय पुरुषाला असे दोघांना मिळून यकृताचा भाग देण्यात आला, तर मूत्रपिंड लीलावती रुग्णालयातील महिलेला आणि हिरानंदानी रुग्णालयातील पुरुषाला देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांत ३१ जणांनी केले अवयवदान
By admin | Published: July 09, 2016 2:19 AM