मुंबई विमानतळावर सहा महिन्यांत २ लाख २० हजार कोरोना चाचण्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई) गेल्या सहा महिन्यांत काेराेनासंदर्भात तब्बल २ लाख २० हजार आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. विमान वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर ६ सप्टेंबर २०२० पासून येथे प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.
सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान करण्यात आलेल्या २.२० लाख चाचण्यांपैकी १ हजार ४८० अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती, मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. प्रवाशाची चाचणी केल्यानंतर ८ तासांत अहवाल दिला जातो. अतिरिक्त शुल्क भरून तत्काळ (१३ मिनिटांत) अहवाल मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.
टर्मिनल १ आणि २वर आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी जवळपास ३० काऊंटर उभारण्यात आले आहेत. नमुना घेतल्यानंतर (स्वॅब) ८ तासांत मिळणाऱ्या अहवालासाठी ८५० रुपये, तर तत्काळ अहवालासाठी ४ हजार ५०० रुपये आकारले जातात. प्रवाशांना विमानतळावर सोडण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही येथे चाचणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
* येथून आलेल्यांना ठेवले जाते संस्थात्मक विलगीकरणात
युके, युरोप, मध्य पूर्वेकडील देश, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते. उपरोक्त देश वगळता इतर देशांतून येणाऱ्या किंबहुना आंतर्देशीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा अहवाल ७२ तासांपुरता वैध असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
...................