राज्यात लवकरच सहा नवी ट्रॉमा केअर सेंटर, आरोग्य विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:20 AM2022-07-25T10:20:31+5:302022-07-25T10:21:18+5:30

शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील विविध भागांत प्रथम दर्जाची सहा शासकीय ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

Six new trauma care centers in the state soon, the decision of the health department | राज्यात लवकरच सहा नवी ट्रॉमा केअर सेंटर, आरोग्य विभागाचा निर्णय

राज्यात लवकरच सहा नवी ट्रॉमा केअर सेंटर, आरोग्य विभागाचा निर्णय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
 मुंबई : अपघात झाला की सर्वप्रथम अपघातग्रस्तांना गरज असते ती तातडीच्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचारांची. त्यामुळे अपघातानंतरचा एक तास मोलाचा असतो. याच काळात अपघातस्थळापासून नजीकच्या उत्तम हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताचे प्राण वाचतात. त्यासाठी नातेवाइकांना भरमसाठ खर्चाचा भार सोसावा लागतो. मात्र, आता प्रथम दर्जाची सहा शासकीय ट्रॉमा केअर युनिट्सची स्थापना करण्यात येणार असून त्यामुळे अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर ट्रिटमेंट’ मिळण्यास मदत होणार आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील विविध भागांत प्रथम दर्जाची सहा शासकीय ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या शहरांमध्ये शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन केले जाणार आहेत. 

राज्य महामार्ग पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार,  गेल्या वर्षी २०२१ मध्ये २९ हजार ४९३ अपघात झाले असून त्यामध्ये १३ हजार ५२८ नागरिकांना रस्त्यावरील अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते. तर १६ हजार ०७८ नागरिकांना गंभीर दुखापत झाली होती. 

मुंबईबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केअर सेंटर असणे फार गरजेचे आहे त्यामुळे अपघातग्रस्तांना एकाच सेंटरवर सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणे शक्य होणार आहे. रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच या अशा उपचारांकरिता प्रचंड खर्च येतो, याचा नक्कीच फायदा रुग्णांना मिळणार आहे. 
 - डॉ. गुस्ताद डावर, माजी अधिष्ठाता, जे. जे रुग्णालय आणि ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय

प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट म्हणजे?
 प्रथम दर्जाच्या ट्रामा केअर युनिटमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एकाच छताखाली सर्व उपचार अपघातग्रस्तांना मिळणार आहे. या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिकी सर्जन, ऍनेस्थेसिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका या उपस्थित असतात. तसेच ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असते. रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या युनिटमध्ये घेतली जाते.

Web Title: Six new trauma care centers in the state soon, the decision of the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.